पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस

पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतील कॉंग्रेसच्या स्थितीबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या जमीनदारासारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपआपल्या तयारी सुरु केली आहे. पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या वादावर विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्याचं समर्थन करत काँग्रेसवर टीका केली आहे.

मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजरान चाललं आहे तशा प्रकारचंच वर्णन शरद पवारांनी केलं आहे. शरद पवारांनी केलेले वर्णन हे काँग्रेससाठी चपखल लागू होणारे आहे. काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस पक्षावर फडणवीसांनी निशाणा साधला आहे. मला असं वाटतं काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन हे दुसरं असूच शकत नाही. कारण काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेसबाबत बोलताना, ‘उत्तर प्रदेशमधल्या जमीनदारांकडे मोठी शेती आणि हवेली होती, पण लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्या जमिनी गेल्या आणि हवेली राहिली. जुनी झालेली ही हवेली दुरुस्त करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन 15-20 एकरावर आली. सकाळी उठून जमीनदार हवेलीच्या बाहेर बघतो तेव्हा त्याला समोर हिरवं पिक दिसतं, तेव्हा तो हे सर्व पीक माझं होतं, असं सांगतो, पण आता नाही,’ असं म्हणत पवारांनी काँग्रेसच्या आताच्या परिस्थितीबाबत रोखठोक भाष्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या