fbpx

हिंजवडीत कायम ट्राफिक जॅम, आयटीयन्सन आणि गावकऱ्यांनी हे चित्र बदलण्याचा उचलला विडा…

पुणे : हिंजवडी हा भाग कायम ट्राफिक जॅम असलेला भाग. पण हे चित्र बदलण्याचा जणू विडा येथील गावकरी आणि आयटीयन्सनी उचलला आहे. याबाबत त्यांनी उद्योगमंत्र्यांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे .
असे म्हणतात की शहरीकरण झाले की विकास होतो व त्या भागाची प्रगती होते. पूर्वी टुमदार असलेल्या हिंजवडी गावचा विकास झाला. मोठ्या इमारती झाल्या, हिंजवडी झकपक झाली. जमिनींना भाव आला. परंतु या भागाला वाहतूक कोंडीने ग्रासले. ही वाहतूक कोंडी कमी करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. पण ते सगळे निरुपयोगी ठरले.
हिंजवडी येथे रसिला या तरुणीचा भर दिवसा तिच्या कंपनीच्या आवारातच खून झाला व या घटनेने कधी एकत्र न येणारे आयटीयन्स एकत्र आले. त्यांनी व्हॉटस अॅप व फेसबूकवरुन त्यांची ऑनलाईन कमिटी स्थापन केली. त्यांच्यापैकी अमित तलाठी यांनी सोशल मीडियामधून वाहतूक कोंडीचा विषय छेडला. आणि काय आश्चर्य त्यांच्या हिंजवडी आयटी इंजिनिअर्स या वॉटसअॅप ग्रुपवर तक्रारी व सूचनांचा पाऊस सुरु झाला.
याविषयी बोलताना अमित तलाठी म्हणाले की, येथील वाहतूक कोंडीला स्थानिक नागरिक व नोकरदारांना रोज तोंड द्यावे लागत आहे. मात्र यावर तोडगा निघत नाही. यासाठी आम्ही पुढाकार घ्यायचे ठरवले. हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे व शाम हुलावळे यांच्याशीही याबाबत चर्चा केली. त्यांनीही या वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास सांगितला. त्यानुसार उद्योगमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सविस्तर निवेदन देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना ई-मेलवर सगळ्या समस्या पाठवल्या. त्यावर त्यांनी उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले आहे.