खासदार भावना गवळी प्रकरणी ईडीकडून हिंगोलीतील व्यापाऱ्याला अटक, तक्रारकर्ते हरीश सारडा यांची माहिती

Bhavana Gawali

हिंगोली : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची शंभर कोटी भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात भावना गवळी यांचे परभणी येथील निकटवर्तीय कंत्राटदार सईद खान यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून आदिवासी विभागाचा २३१ कोटींचा खाऊ घोटाळा झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. सदर प्रकरणात एकूण पाच आरोपी असून हिंगोली येथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला ईडीकडून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती वाशिम येथील माजी नगरसेवक तथा भावना गवळी प्रकरणाचे तक्रारकर्ते हरीश सारडा यांनी वाशिम येथे माध्यमांशी बोलतांना दिली.

हिंगोलीतील एक प्रतिष्ठित व्यापारी तथा राजकीय व्यक्तीचे नाव चर्चेत आल्याने हिंगोलीच्या राजकीय राजकीय पटलावर खळबळ माजली आहे. गुरुवारी सकाळ पासूनच ईडीचे पथक हिंगोली जिल्ह्यात दाखल झाल्याची चर्चा सुरू होती. पण सदर पथक कुठे आहे, कुणाची चौकशी करीत आहे. या व्यापाऱ्याला हिंगोली येथून ताब्यात घेतलं की त्यांना समन्स देऊन मुंबईला बोलावलं होतं, याबाबतची माहिती रात्री उशिरा पर्यन्त मिळाली नव्हती.

ईडी चौकशी करीत असल्याच्या बातमीने जिल्ह्यात मात्र खरमरीत चर्चांना उधाण आले होते. तर काही राजकीय पक्षाच्या कार्यालयीन बैठका सुद्धा सुरू होत्या. या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाली नसली तरी, या सर्व प्रकरणामुळे खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या