जामठी शिवारातील जंगलात हरणाची शिकार, हिंगोली तालुक्यातील प्रकार

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील जामठी शिवारामधील जंगलात हरणाची शिकार केल्याचा प्रकार रविवार सकाळी उघडकीस आला आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांनी पळ काढला.

हिंगोली तालुक्यातील जामठी शिवारातील जंगलामध्ये रोही, हरीण, काळवीट आदी वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. रानडुकरांचे कळपही आहेत. या भागामध्ये वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये, यासाठी वनविभागाचे पथक गस्तीवर असते. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जंगलामध्ये एका हरणाचे पाय व डोके धडावेगळे करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

त्यानंतर विभागीय वनअधिकारी केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. टाक यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पथक जंगलात येत असल्याची कुणकुण लागताच तेथे असलेले शिकारी पळून गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावरून हरणाचे पाय व डोके तसेच इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. वनविभागाने या शिकाऱ्यांचा शोध सुरू केला असून, रात्री वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

यासंदर्भात विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून वनविभागाच्या पथकाला घटनास्थळावर हरणाचे डोके व पाय आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळावरून चार दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. या दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला जाणार आहे. त्यांच्या चौकशीतून हरणाची शिकार करणाऱ्यांचा माग काढण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे वाबळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या