…. तर हिंदू रस्त्यावर उतरतील – विश्व हिंदू परिषद

नवी दिल्ली : सध्या अयोध्याप्रकरण न्यायप्रविष्ट असून,या वादग्रस्त जागेवर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही गटाकडून दावा सांगण्यात येत आहे. दरम्यान अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास देशभरात आंदोलनं होतील, असं वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केल आहे. न्यायालयानं भावना दुखावणारा निकाल दिल्यास, अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्याचा कायदा संमत करण्यासाठी देशभरातील हिंदू आंदोलनं करुन त्यांच्या खासदारांवर दबाव आणतील, असंही त्यांनी म्हटलंय. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच कोकजे यांनी हरिद्वारला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सर्वोच्च न्यायालयात असलेला राम जन्मभूमी प्रकरणाचा खटला लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षा कोकजे यांनी व्यक्त केली. ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षेप्रमाणे लागेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेच्या कायदेतज्ज्ञांना वाटतो,’ असंही कोकजे यांनी म्हटलं. न्यायालयाचा निकाल श्रद्धेच्या विरोधात गेल्यास देशभरातील हिंदू आंदोलनं सुरू करतील आणि आपापल्या खासदारांवर दबाव आणून त्यांना अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी कायदा संमत करायला लावतील, असं कोकजे यांनी म्हटलं. दरम्यान कोकजे यांच्या या विधानामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.