हिमायातबाग गोळीबार प्रकरणी 2 दहशतवाद्यांना 10 वर्षांची सक्तमजुरी

aurangabad court

औरंगाबाद/प्रतिनिधी: 26 मार्च 2012 मध्ये शहरातील हिमायत बाग भागात दहशतवादी आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांच्यात चकमक उडाली होती. यात एक अतिरेकी ठार झाला होता. तर, एकाच्या पायात गोळी लागून तो जखमी झाला होता . तसेच एक पोलिस कर्मचारी देखील या चकमकीत जखमी झाला होता. या प्रकरणी कलम ३०७ , 333, ३३५, ३३६, ३३८, ३५२, ३५३ आणि ३४ भा दं वी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्याम जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दोन अतिरेक्यांना 10 वर्षांची सक्तमजुरी सुनावली. मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ अब्दुल्ला उर्फ इस्माईल (४०, रा. चंदन नगर, मध्यप्रदेश) आणि शाकेर हुसेन (२५, रा. मध्यप्रदेश) अशी शिक्षा सूनवलेल्या अतिरेक्यांची नावे आहेत. तर, खलील उर्फ अजहर कुरेशी असे मयताचे नाव आहे. जफर खान आणि अन्वर खान या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

इंडियन मुजाहिदीन तथा सिमी संघटनेचा कट्टर सदस्य आणि २००८ मधील अहमदाबाद बॉम्बस्फोटातील एक आरोपी अबरार ऊर्फ मुन्ना हा २६ मार्च २०१२ रोजी आपल्या साथीदारांसह हिमायतबाग परिसरात येत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना मिळाली होती. ठाकरे एटीएसचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना ही माहिती दिली. रेड्डी यांनी तीन पथके तयार करून अबरारला जिवंत पकडण्यासाठी सापळा रचला. दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान पथकातील सदस्यांना अबरार हा आपल्या दोन साथीदारांसोबत येताना दिसला. त्यांनी अबरार ऊर्फ मुन्ना यास अडविण्याचा प्रयत्न करताच अबरारचा ऊर्फ मुन्नाचा साथीदार महंमद शाकेरने पथकाच्या दिशेने पिस्तूल रोखून गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस हवालदार शेख आरेफ याच्या डाव्या दंडाला गोळी लागून तो जखमी झाला.

दरम्यान, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या पथकाने दहशतवाद्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या असता अजहर ऊर्फ खलील अब्दुल वकील कुरेशी (वय २२ रा. गुलशननगर खंण्डवा, मध्यप्रदेश) आणि महंमद शाकेर हे दोघे जखमी झाले. तर प्रत्युत्तर देणाऱ्या अतिरेकी अबरार ऊर्फ मुन्ना यास छत्रीबागेजवळ दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि जिंवत काडतूस जप्त करण्यात आले. जखमी अजहर ऊर्फ खलील कुरेशीवर उपचार सुरू असताना तो मरण पावला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस हवालदार शेख आरेफ जखमी झाल्यामुळे त्यांना देखील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .या गुन्ह्याचा तपास तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी केला.

Loading...

खटल्याची सुनावणी ११ सप्टेंबरपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली. २७ सप्टेंबरपर्यंत १६ दिवसांत ही सुनावणी पूर्ण झाली. सहाय्यक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी २३ साक्षीदार तपासले. यामध्ये पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, शिवाजी ठाकरे, न्यायवैद्यक शाळेचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने महंमद अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबू खाँ आणि महंमद शाकेर या दोघांना दोषी ठरवून भादंवि ३०७ कलमान्वे १० वर्ष सक्तमजुरी, प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजुरी, भारतीय हत्यार कायदा ३, २५ कलमान्वये ३ वर्ष सक्तमजुरी, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजुरी, ३५३ आणि ३४ कलमान्वे १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दरम्यान जखमी पोलीस हवालदार शेख अरेफ यास नुकसान भरपाईपोटी ३० हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.