हायवे आणले आता रेल्वे सुद्धा आणणार ; संभाजी पाटील निलंगेकरांचा निर्धार

टीम महाराष्ट्र देशा (प्रा. प्रदीप मुरमे ) मागील चार ते साडेचार वर्षात लातूर जिल्ह्यात चार हायवे,रेल्वे बोगीच्या कारखान्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी खेचून आणला असून भविष्यात लवकरच निलंगा विधानसभा मतदार संघात रेल्वे आणून हा मतदारसंघ दळणवळण सोयीसुविधांनी युक्त करून निलंगा मतदारसंघाचा कायापालट करू अशी ग्वाही पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. जिजाऊ वाचनालय इमारतीचा लोकार्पण सोहळा निलंगा येथील जिजाऊ सृष्टी येथी पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ना. निलंगेकर म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील जनतेनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं आहे. या जिल्ह्यातील जनतेनी यापूर्वी कधीही एक हाती कोणत्याही नेत्याला दिली नाही. आपण मात्र याबाबतीत भाग्यवान असून या जनतेनी आपल्याला जिल्हा परिषद ,महानगरपालिका या सारख्या स्थानिक स्वराज संस्थे मध्ये एकहाती सत्ता देऊन आपल्या प्रति भरभरून प्रेम व मोठा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या जनतेच्या विश्वासाला आपण कदापि तडा जाऊ देणार नाही. आठ – नऊ वर्षे मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यालाही जिल्यात आपल्यासारखी एकहाती सत्ता मिळवता आली नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव न घेता केली.

केंद्रातील व राज्यातील भाजपचे हे सरकार हे लोकहिताचे व विकासाचे सरकार आहे. ज्या कुटुंबाना पक्के घरे नाहीत अशा कुटुंबांना सरकार घरे देणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना उद्योगात आणण्यासाठी सरकारने हिरकणी महाराष्ट्राची हि योजना आणली आहे. नुकतीच लातूर व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात हि योजना सुरु करण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत आपण मला निवडून द्या मी निलंगा मतदारसंघात हायवे आणणार असा मी आपणास शब्द दिला होता. परंतु त्यावेळी माझ्या विरोधकांनी आपल्या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती. पण आज ती घोषणा पूर्ण केली असून निलंगा मतदार संघात हायवे आणून आपण प्रचारा दरम्यान दिलेला शब्द पाळला आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी आपण कॅबिनेट मंत्री झालो आहोत हि किमया केवळ जनतेच्या आशिर्वादामुळे शक्य झाले आहे याची जाणीव ठेवून मंत्रिमंडळात काम करत आहे . त्यामुळे केवळ मी मंत्री नसून मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती मंत्री आहे अशी भावना ना. निलंगेकर यांनी व्यक्त केली.

आपल्या जडणघडणी मध्ये आईचे(माजी खा. श्रीमती रूपाताई पाटील ) संस्कार मोलाचे असून या संस्कारांमुळेच आपण घडू शकलो. आगामी निवडणुकीत परत संधी द्या मतदारसंघात रेल्वे आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली. हायवे,रेल्वे आणून हा मतदारसंघ दळणवळण युक्त करून निलंगा,शिरूर अनंतपाळ व देवणी हि तालुके केंद्रस्थानी मानून या भागात विकासाची गंगा आणून जनतेला अभिमान वाटेल असे काम करू असा विश्वास ना. निलंगेकर यांनी यावेळी बोलताना दिला. नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार विक्रम देशमुख, डॉ. लालासाहेब देशमुख,प्राचार्य डॉ. व्हि. एल. एरंडे,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील,पं. स. सभापती अजित माने आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.मराठा सेवा संघाच्यावतीने ना. निलंगेकर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एम. एम. जाधव तर सूत्रसंचालन सतीश हानेगावे यांनी केले.