अहो दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकायचं नाही असं ठरवलं काय?

औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त होतेय. याच पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लाईव्ह येत नागरिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मास्क, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे यासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारीच आमदार तथा शिवेसनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला अक्षरश केराची टोपली दाखवली. सोमवारी (दि.२२) औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी राजकारण्यांनी सगळे नियम धाब्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसले. यात आ.अंबादास दानवे, माजी आमदार सुभाष झांबड, कन्नडचे आमदार रमेश बोरणारे, काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यासह अनेक राजकारण्यांचा समावेश होता.

लॉकडाऊन राज्यात करायचे की नाही हे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेवर सोपवले आहे. औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. पंरतू याबाबत येथील राजकारणी बेफिकीर असल्याचे दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोरोना नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. पक्षाचे पदाधिकारी नाही, किमान लोकप्रतिनिधी म्हणून तरी अंबादास दानवेंनी याबाबत जागरूक राहायला हवे होते. मात्र, त्यांनाही साधे ते जमले नाही.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहनाला केराची टोपली

मास्क न घातल्यास, नियमांचे पालन न केल्यास नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना अनेकांना तोंडावरचा मास्क काढला होता. यावर प्रशासन कारवाई करणार की नाही. केवळ जनतेला नियम दाखवायचे आणि राजकारण्यांनी बेफिकीर राहायचे हा कोणता कायदा आहे, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या कोरोनाबाबतचे आवाहनाला राजकारणी थेट केराची टोपली दाखवत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP