fbpx

इथून पुढे मी पक्षशिस्तीचे पालन करेल : साध्वी प्रज्ञासिंह

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीमध्ये वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी इथून पुढे आपण पक्षशिस्तीचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन पक्षाला अडचणीत आणले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अनुशासन समितीने साध्वी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.या नोटीसला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा यांनी शिस्त पालन करणार असल्याच आश्वासन दिल आहे.

नोटीसला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे की, मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनेत शिस्त असायलाच हवी. मी त्या शिस्तीचे पूर्णपणे पालन करेन. त्यामुळे मला संधी मिळेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आवडेल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे आणि महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यानंतर भाजप पक्षाला सामाजिक रोषाचा सामना करावा लागला. तसेच विरोधकांच्या टीकेचा देखील सामना करावा लागला.

साध्वी यांचे महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेबाबतचे वक्तव्य हे संताप जनक होते. या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दुखावले होते. यावर मोदी म्हणाले होते की, पक्षाने साध्वीला माफ केल असल तरी मी मात्र साध्वीला माफ करणार नाही.