. . . म्हणून मुंबईत मराठा आंदोलन पेटले

मराठा आरक्षणासाठी पुकारेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी दुपारी स्थगिती दिल्यानंतरही ठाणे, नवी मुंबईमध्ये या आंदोलनाचे पडसाद अजूनही जाणवत आहेत. अजूनही कळंबोळीमध्ये तणावाचे वातावरण असून, दगडफेक, जाळपोळ यासारख्या घटना समोर येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणतही आश्वासन न देताही, हे आंदोलन मागे का घेण्याचा निर्णय घेण्यात आला असा संतप्त सवाल कार्यकर्ते विचारात आहेत. त्यामुळे मराठा संघटनांना विचारात न घेता मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी हा निर्णय का घेतला असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावे, आंदोलन समाजाच्या हातात गेले असून, आम्ही जमावाला समजवण्यासाठी गेलो तरी पोलीस आमच्यावर लाठीचार्ज करत आहेत असा आरोप मराठा समन्वयक करत आहेत.

बंदमध्ये हिंसक प्रवृत्तीचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचे सांगत या आंदोलना दरम्यान काही लोकांना त्रास झाला असल्यास त्यांची आम्ही माफी मागतो असे सांगत मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील आंदोलन स्थगित केल्याचे मराठा समन्वयक यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलकांनी शांतता राखावी असे आवाहन मराठा समन्वयकांनी यांनी केले आहे.

तब्बल ६ तास रास्तारोको आणि पोलिसांचा गोळीबार

कळंबोळीमध्ये वातावरण एवढे तापले की कळंबोळीमध्ये आंदोलकांनी तब्बल ६ तास रस्तारोको केला. या दरम्यान तणावाचे वातावरण देखील पहायला मिळाले. कळंबोळीतील रास्तारोकोमुळे पुण्याकडे आणि कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान कळंबोळीमध्ये जमावाने पोलिसांच्या दोन गाड्या फोडल्या तसेच दगडफेक देखील केली यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.