सर्व धर्मियबांधवांकडून दिव्यांग कीर्तनकाराला मदतीचा हात, दक्षता फाउंडेशनचा पुढाकार!

Divyang Kirtankara

उस्मानाबाद :  तालुक्यातील बेंबळी येथील अंध कीर्तनकाराला दक्षता फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. यासाठी सर्वधर्मीय नागरिकांनी धार्मिक सलोख्याचे अनोखे दर्शन घडवत कीर्तनकाराला निवारा व स्वच्छतागृह तयार करून दिले आहे. या निवाऱ्याच्या चाव्या विधिवत पद्धतीने गुरुवारी सुपूर्त करण्यात आल्या. बेंबळी येथील कीर्तनकार बंडोपंत गोसावी हे जन्मतः दृष्टीहीन आहेत. त्यांना जवळचे वारस कोणीही नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना वास्तव्य करण्यासाठी निवारा उपलब्ध नव्हता. तसेच स्वच्छतागृह नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती.

ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. तेव्हा दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण, विश्वस्त पत्रकार ॲड. उपेंद्र कटके, पत्रकार गोविंद पाटील, ग्रामसेवा ग्रुपचे चंद्रकांत खापरे, प्रा. धनंजय भोसले, पुणे येथील अभियंता तानाजी खापरे यांच्याशी ह भ प मोहनआप्पा वाघुलकर महाराज यांनी यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा एका उपक्रमासाठी उपलब्ध असलेला निधी सर्वांनी बंडोपंत गोसावी यांच्या निवाऱ्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्रामपंचायत सदस्य नबाब पठाण, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गवळी यांनीही दुजोरा दिला. पूरग्रस्तांसाठी सर्वधर्मीय नागरिकांनी हा निधी उपलब्ध केला होता. सर्व देणगीदारांच्या संमतीने या निधीतून निवारा उभा करण्याचे नियोजन करण्यात आले.

देणगी देणाऱ्यामध्ये गावातील सर्व स्तरातील व सर्व घटकातील नागरिकांचा समावेश आहे. कोणीही यावर आक्षेप न घेता गावातील कीर्तनकार म्हणून सहकार्य केले. गुरुवारी कीर्तनकार गोसावी यांना चाव्या देण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपसरपंच नितीन इंगळे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ गवळी, ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण, हभप मोहनआप्पा वाघुलकर, मृदंगाचार्य हरिभाऊ सांगवे आदी उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे स्वच्छतागृह बांधण्यासाठी एका व्यक्तीने संपूर्ण खर्च उचलला. त्यांनी नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.

गीता, ज्ञानेश्वरी मुखोद्गत :  बंडु नाना गोसावी हे अंध असले तरी त्यांना धर्म व संप्रदाय यातील मोठे ज्ञान आहे. गीता त्यांना पूर्णपणे पाठ आहे. गीतेतील कोणताही श्लोक ते सांगू शकतात. गावात कुठेही किर्तन असले व कीर्तनकार चुकत असले तर ते अगदी हक्काने चूक सांगतात. बेंबळी पंचक्रोशीसह जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही त्यांच्या किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. त्यांच्या या खुबीमुळे गावातील ते भूषण बनले आहेत. त्यांना निवारा उपलब्ध नव्हता. यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना निवारा उपलब्ध करून दिला.

महत्त्वाच्या बातम्या