५० सुवर्णकारांना दिला मदतीचा हात…लोकमंगलमुळे जगणे झाले सोपे!

lokmangal

सोलापूर : सोन्याचे दागिने तयार करणारा कारागीर त्याला मिळणाऱ्या  मजुरीत कसेबसे दिवस काढत असतो. त्याच्या जगण्याची लोकांना माहिती नसते आणि त्यालाही बाहेरच्या जगात काय चालले आहे याचे गम्य नसते. करोनाने या लोकांचे काय हाल झाले असतील याचा विचार कोणी केला नसेल पण वास्तवात ते फारच उद्ध्वस्त झाले होते. आमदार सुभाषबापू देशमुख यांनी शहरातल्या अशा ५० कारागिरांच्या अडचणीची जाणीव ठेवली आणि त्यांचे जगणे मुळावर यावे यासाठी त्यांना लोकमंगल पतसंस्थेतून ५० लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले.

या कारागिरांची संघटना स्थापन करणारे श्याम पोतदार यांनी ही माहिती दिली. करोनाने आलेल्या आपत्तीमुळे सराफी दुकाने बंद झाली पण त्यामुळे जे कारागीर बेकार झाले याची फारशी जाणीव लोकांना झाली नाही कारण हा कारागीर जनतेत न मिसळणारा असतो. कामे बंद पडली आणि अन्य सगळ्याच क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यालाही जगण्याची चिंता भेडसवायला लागली. या कारागिरांकडे धंद्याचा भाग म्हणून चार ते पाच ग्रॅम सोने ठेवलेेले असते. ते मोडून दिवस काढले पण तेही पैसे संपल्यावर पुढे काय हा प्रश्न सतवायला लागला.

अशा वेळी बँका, पतसंस्था, सावकार, फायनान्स कंपन्यांकडून काही उचल घेता आली असती पण हा कारागीर समाजापासून एवढा दूर आहे की त्यांचा अशा संस्थांशी कधी कसलाच संबंध आलेला नसतो. कित्येक कारागीर एवढे स्वत:तच मग्न असतात की अशा संस्थेकडून काही मदत मिळवायचीच म्हटले तरी त्यासाठी लागणारी कागदपत्रेही त्यांच्याकडे नसतात. असे सांगताना पोतदार म्हणाले, आम्ही कालिका प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आहे. तिच्या मार्फत काही प्रयत्न करावेत अशी कल्पना पुढे आली.

त्या दिशेेने प्रयत्न करताना लोकमंगल पतसंस्थेचे नाव समोर आले. आम्ही संस्थेच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधला तेव्हा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी पाटील आणि व्यवस्थापिका अलकाताई देवडकर यांनी एवढी आपुलकीने चौकशी केली की, एखाद्या संस्थेत कर्ज मागायला गेल्यावर एवढी चांगली वागणूक मिळू शकते यावर विश्वासच बसेना.

पुढे साऱ्या औपचारिता पूर्ण केल्या आणि आठवड्याच्या आत ५० कारागिरांना प्रत्येकी एक लाखाचे कर्ज मंजूर झाले. कसलाही वशिला नसताना केवळ बापूंनी सहानुभूतीची भूमिका घेतल्यामुळे हे झाले. संस्थेचे चेअरमन  गुरण्णा तेली यांनीही मोठे सहकार्य केले आणि कारागिरांचे जीवन सुरळीत करण्यास मदत केली.

आम्हाला या निमित्ताने बापूंची भेट घेतल्यावर एक सुखद अनुभव आला. त्यांनी ही मदत तर मंजूर करून दिलीच पण सर्वांना, केवळ कारागीर म्हणून काम न करता स्वत:चा सराफी धंदा सुरू करावा, असा सल्ला दिला. या ५० कारागिरातला जो कोणी सराफी व्यवसाय करण्यास उत्सुक असेल त्याला २० लाख रुपयांपर्यंत मदत करण्याची त्यांनी तयारी दाखवली.

आम्हाला आता धीर आला आहेे. आपल्या जीवनात अंधार पसरला असताना कोणीतरी उजेड दाखवणारा मिळतो याची खात्री पटली आहे. आम्ही सुभाष बापूंच्या मदतीने नक्कीच मोठी झेेप घेऊ अशी महत्त्वाकांक्षा वाढीस लागली आहे.

महत्वाच्या बातम्या :