सीमेवर लढा देणाऱ्या सैन्यदल अधिकाऱ्याची कोरोनाविरोधी लढ्यात मदत

वैजापूर : भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मीर लद्दाख येथील प्रत्यक्ष सीमारेषेवर कमांडो पदावर कर्तव्य बजावणारे वैजापूर तालुक्यातील नगीना पिंपळगाव येथील चंद्रकांत दादासाहेब त्रिभुवन यांनी आपल्या वेतनातून केंद्र सरकारच्या कोविड सेंटरला ऑक्सिजन युनिट घेण्यासाठी पाच लाखांची आर्थिक मदत केली आहे. कमांडो त्रिभुवन यांचा या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सीमेवर प्राणाची बाजी लावून शत्रुंशी दोन हात करणारा सैनिक वेळप्रसंगी समाजाच्या मदतीसाठी पुढे येतो याचे उत्तम उदाहरण त्रिभुवन यांनी घालून दिले आहे.

देशभरात कोविड रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहे. यामुळे बैचेन झालेल्या सैनिक त्रिभुवन यांनी त्यांच्या मातोश्री कडूबाई त्रिभुवन यांच्याशी चर्चा केली. त्यांना मिळणाऱ्या वेतनातून त्यांनी पाच लाखांचा निधी केंद्र सरकारला प्रदान केला. त्यांनी शहिद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या नवीन घराचा गृहप्रवेश सोहळा देखील रद्द केला होता.

पिंपळगाव येथील रहिवासी असलेले चंद्रकांत अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते सैन्य दलात भरती झाले आहे. गृहप्रवेश सोहळा रद्द करून त्यांनी ती रक्कम शहीद कुटुंबाला सुपूर्द केली आहे. मागील वर्षात लॉकडाऊनमध्ये वैजापूरला ते अडकून पडले होते. त्या दरम्यान त्यांनी पोलीस व सैन्य दलात भरती होण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांना भरतीपूर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले होते. त्यांच्या एकूण सामाजिक सेवेची दखल घेत सैन्य दला कडून त्यांना सेवा पदकाच्या सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या एकूण सामाजिक कार्याबद्दल वैजापूर तालुक्यात कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या