मदतीचा ओघ सुरू : पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेच्या १०८ कर्मचाऱ्यांचं पथक रवाना

टीम महाराष्ट्र देशा: पूरग्रस्तांसाठी राज्याच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करावी लागणार आहे,हे लक्षात घेऊन पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या १०८ कर्मचाऱ्यांचं पथक रवाना होणार आहे. यात १०३ कर्मचारी आणि पाच मुकादमांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी आज दिली.

तसंच पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या ४२ डॉक्टरांचं पथक पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक औषधं आणि इतर साहित्य घेऊन रवाना झालं आहे.तर पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसनं पूरग्रस्तांसाठी खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे २ ट्रक रवाना केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसचे कार्यकर्तेही मदत कार्यासाठी सांगली आणि कोल्हापूरला गेले आहेत.

भाजपाचे नगरसेवकही आपल्या प्रभागस्तरीय निधीतून प्रत्येकी १ लाख रुपये आणि एक महिन्याचं मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज ही माहिती दिली.

मदत आणि बचाव कार्यासाठी जाणाऱ्या वाहनांना पुण्यापासून कोल्हापूर आणि सांगलीपर्यंत जाण्यासाठी महामार्गावर स्वतंत्र ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.