‘कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करा’, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स

कोरोना

मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रातील जवळपास २० हजार महिला विधवा होऊन निराधार झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यांनी जवळपास दोनशे संघटनांसोबत या महिलांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केलेत. विधवा झालेल्या सुमारे २० हजार महिलांसाठी राज्य सरकारने तातडीने धोरण जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. याकरिता राज्यातून १४०० मेल पाठवत संबंधितांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पीडित महिलांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

दिल्ली, राजस्थान, आसाम, ओरिसा, बिहार या राज्यांनी तातडीने वेगवेगळ्या मदत योजना जाहीर करून विधवांना मदत केली. आसाम सरकार अशा प्रत्येक महिलेला अडीच लाख रुपये व मुलींच्या लग्नाला एक लाख रुपये, दिल्ली सरकार ५० हजार रुपये व पेन्शन, राजस्थान सरकार एक लाख रुपये व मुलांच्या शिक्षणासाठी मदत, केरळ सरकारचीही एक लाख रुपये मदत करत आहे, अशी माहिती हेरंब कुलकर्णी यांनी दिली.

त्या योजनांचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारनेही या महिलांना मदत करावी, पेन्शन सुरू करावी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिलांच्या रोजगारासाठी संधी प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. या महिलांचे सासरच्या मालमत्तेवरील अधिकार अबाधित राहण्यासाठी तातडीने आदेश देणे. विविध शासकीय योजना या महिलांना महिन्यासाठी यातील गरजू लाभार्थी शोधून त्या योजना मंजूर कराव्यात. १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत स्तरावरील निधी या महिलांसाठी योग्यप्रकारे वापरावा रेशनमध्ये अंत्योदय योजनेत या महिलांचा समावेश करावा, विविध नोकऱ्यांमध्ये या महिलांचा प्राधान्याने विचार करावा. अशा अनेक विविध मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

कोरोना कुटुंब पुनर्वसन समितीने राज्यातील १५० पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांनी २० जिल्ह्यातून एकाच दिवशी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना १४०० इमेल्स पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व सर्वच भागातून कार्यकर्त्यांनी मेल पाठवले आहेत.

महत्वाच्या बातम्या