fbpx

VIDEO : दादागिरी करू नका म्हणत भाजप आमदार मेधा कुलकर्णींना आंदोलकांनी हाकलले !

टीम महाराष्ट्र देशा : हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकर आक्रमक झाले आहेत. आणि आज पुणेकरांच्या या नाराजीचा फटका भाजपच्या कोथरूड मतदार संघातील आमदार मेधा कुलकर्णी यांना बसला आहे.

पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार मेधा कुलकर्णी या उपस्थित होत्या. आंदोलनकर्ते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा देत असताना मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मेधा कुलकर्णी यांना दादागिरी करू नका अशा घोषणा देत हुसकावून लावले.

दरम्यान, पुणे वाहतुक पोलिसांनी १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली आहे. त्या निषेधार्थ शहरातील अनेक संघटना एकत्रित आल्या असून मागील महिनाभरात अनेक वेळा हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.

या हेल्मेट सक्तीला आज महिना झाल्याच्या निमित्ताने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने महात्मा फुले मंडई चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, भाजपा आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेविका रूपाली पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच शहरातील विविध संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.