मुंबापुरीला पावसाने धो धो धुतले

Heavy rains in Mumbai

मुंबई : राज्यात पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी देखील पावसाचा जोर कायम राहिला असून, सकाळी आठच्या नोंदीनुसार मुंबईत सरासरी १९१.२ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. पुढील सहा तास मुंबईतील विविध भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

बुधवार सकाळी ८ वाजून ३० मिनीटांपासून ते आज सकाळपर्यंत बांद्रा – २०१ मिमी, कुलाबा – १५२ मिमी, सांताक्रुझ – १५९.४ मिमी, महालक्ष्मी – १२९ मिमी, राम मंदिर – १३० मिमी पावासाची नोंद झाली असल्याची माहिती मिळाली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दादरमधील विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते.

गुरुवारी सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे हिंदमाता, वडाळा येथील सक्कर पंचायत चौक, सायन येथील एसआयईएस कॉलेज, धारावी रेस्टॉरंट, शेख मिस्त्री दर्गा रोड, पोस्टल कॉलनी, चेंबूर येथील टेबी ब्रीज, देवनार येथील बैंगनवाडी, अंधेरी सबवे, पोयसर सबवे, खार सबवे, मालाड सबवे आणि मिलन सबवे येथील सखल भागात पाणी साचले होते.

हवामान विभागाने किनारपट्टीवर मुसळधार तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, या भागांसाठी तयारीत राहण्याचा इशारा (ऑरेंज अर्लट) देखील देण्यात आला आहे. तर, गुरुवारनंतर पावसाची तीव्रता कमी होत जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस सुरु असतानाच एकूण २८ ठिकाणी झाडे कोसळली. १२ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर ५ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.

दिल्लीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने लावली हजेरी

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; ‘या’ भागात दमदार पावसाची शक्यता