मुंबई, कोकणात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत

blank

मुंबई- कोकणात काल पावसानं हाहाकार उडवला. मुंबईत काल पावसामुळं सखल भागात पाणी साठल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. या भागातली अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं. शहरातल्या नाल्यांनाही पूर आला, रेल्वे मार्गांवरही पाणी साठल्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला.

मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या एक हजार ५० प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या आठ, नौदलाच्या चार तसंच लष्कराच्या दोन तुकड्या आणि भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सैन्य दलाच्या तिन्ही विभागांचं तसंच या बचाव कार्यात मदत करणाऱ्या अन्य संस्थांची प्रशंसा केली आहे.अतीवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे ११ विमानाचं उड्डाणं रद्द करण्यात आली तर मुंबईत येणारी ९ विमाने अन्य शहरात उतरवण्यात आली.

मुंबई शहर आणि परिसरात होत असलेल्या या पावसामुळं अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यातली प्रवेश प्रक्रियेची मुदत २९ जुलैपर्यंत तर फार्मसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पर्याय देण्याचे अर्ज भरण्याची मुदत आज एक दिवस वाढवण्यात आल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं तसंच चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं दोन्ही ठिकाणची मुंबई – गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.

रायगड जिल्ह्यात या पावसानं दोघांचे बळी घेतले आहेत. माथेरानमध्ये सहा वर्षांचा मुलगा गटारात पडून वाहून गेला. तर दहिगाव इंजिवली इथं १८ वर्षांचा तरूण नाला ओलांडत असताना वाहून गेला. जिल्ह्यातल्या सावित्री, कुंडलिका, आंबा, गांधारी, गाढी, उल्हास, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. सावित्री आणि गांधारी नदीचं पाणी महाडमध्ये शिरलं आहे तर खोपोली- पाली मार्गावर अंबा नदीला पूर आल्यानं या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.

पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे.राज्याच्या अन्य भागातही चांगला पाऊस झाला. गडचिरोली, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सांगली इथं काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळं नाशिकची धरणं भरली असून गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. धरणाच्या पाणलोटमधून येणाऱ्या पाण्यात कमालीची वाढ झाली असून काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा ६१ दसलक्ष घनफूटपर्यंत वाढला.