अहमदनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा

टीम महाराष्ट्र देशा / प्रशांत झावरे : मान्सून केरळसह कोकण किनारपट्टीवर दाखल झाला असून, मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यांसह अहमदनगर मध्ये काही भागाला चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात सुमारे ३५० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले असून, कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

या पावसाने व वादळाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, शेतीसह घरांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जनावरे दगावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गार, चांडगाव, आढळगाव, कनसेवाडी, चिखलठानवाडी, सांगवी, मुंढेकरवाडी, अजनुज, आनंदवाडी, काष्टीसह अनेक गावांना या पावसाचा जोरदार तडाखा बसला.नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची विनंती संकट कोसळलेले नागरिक करत आहेत.

या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये विजेच्या तारा तुटल्या असून, पोलसुद्धा पडले आहेत. शाळांचे पत्रे उडाले असून, काही शाळा संपूर्ण उघड्यावर आल्या आहेत, काही घरांच्या पत्र्यांसह भिंतीही पडल्या आहेत. पोल्ट्री शेड, पॉलीहाऊस जमिनीवरून उन्मळून पडली आहेत. डाळिंबाच्या बागा जमिनोदस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने आणि एक तर बाजारभाव नसल्याने व आता नैसर्गिक संकट कोसळल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

IMP