भ्रष्टाचारमुक्त थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार- जयंत पाटील

कोरेगाव: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री  जयंत पाटील यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत करणार असल्याच्या थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.

जयंत पाटील म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारत करणार असल्याच्या थापा मारणाऱ्या भाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. राफेल विमानाच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. भाजपने युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. टू जी स्कॅमबाबतही आरोप केले. मात्र त्यात सर्वजण निर्दोष सुटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी संसदेत गेले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायऱ्यांना नमस्कार केला. लोकांना वाटलं पंतप्रधान असावा तर असा. मात्र जेव्हा त्यांनी देशातील घडणाऱ्या प्रकरणावर बोलण्यास वेळोवेळी टाळले, तेव्हा लोकांना कळले की तो दिखावा होता. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून १२.५ लाख कोटीची गुंतवणूक होईल असं सरकारतर्फे सांगितले जात होते. आम्ही सभागृहात त्याबाबत विचारणा केली तर उत्तर मिळाले नाही. असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. या यात्रेची धास्ती भाजप सरकारला सुद्धा लागली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यात भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल यात्रेचा उल्लेख डल्लामार असा केला होता.