जगातील सर्वात लठ्ठ महिलेचे निधन.

जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख असलेल्या इमान अहमद या महिलेचा मृत्यू झाला आहे. इजिप्तची रहिवासी असलेली ३६ वर्षीय इमान जगातील सर्वात लठ्ठ महिला ठरली होती. काही महिन्यांपूर्वी वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर सैफी रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन ५०० किलोंवरुन २३८ किलोंपर्यंत कमी झाल्याची माहिती होती.
सोमवार २५ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान किडनी फेल आणि आतड्याला सूज आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आलं. अबूधाबी येथील बुरजील रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मुंबईतून इमानला पाच महिन्यांपूर्वीच अबूधाबीला पाठवण्यात आले होते. पोलिसांनी तिच्यासाठी खास ग्रीन कॉरिडोअरची व्यवस्थाही केली होती. इमानवर उपचार केल्याबद्दल आणि तिचे वजन कमी केल्याबद्दल तिची बहिण शायमाने सैफी रूग्णालयाचे आभारही मानले होते. आता मात्र इमान अहमदचा मृत्यू झाला आहे. ४ मे २०१७ ला तिला अबूधाबीला पाठवण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली