हृदयद्रावक चित्र! कोविड रुग्ण; एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

बीड:राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या पादुर्भावासोबत कोरोना रुग्णसंख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असली तरी रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यात मृतांचा आकडा ही वाढत चालला आहे. या परिस्थितीशी झुंज देताना आजही अनेक भागांत औषधं आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त्यात काल बीड येथे एक दुर्दैवी घटना घडली.

मंगळवारी ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या आठही रुग्णांवर अंबाजोगाई नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. या आठही रुग्णांना एकाच चितेवर ठेवून चितेला अग्नी देण्यात आला. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन या मोहीमेअंतर्गत अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. परंतू अनेक ठिकाणी विषाणूच्या जास्त प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर प्रशासकीय यंत्रणा स्वतःच अंत्यसंस्कार करत आहेत.

बीड जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात ७१६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मंगळवारी १० रुग्णांनी आपले प्राण गमावले ज्यातील ८ रुग्ण हे अंबाजोगाई भागातले होते. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता आरोग्य यंत्रणेवरही चांगलाच ताण जाणवतो आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये औषधांचा आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवतो आहे. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमिडेविसीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे.

महत्वाच्या बातम्या