मिलिंद एकबोटे यांच्या जामिनावर 31 जानेवारी रोजी सुनावणी

पुणे-  शिरूर तालुक्‍यातील भीमा कोरेगाव येथे दंगल झाल्याप्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यारत अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालय येथे अटकपूर्व बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला. यावर 31 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

1 जानेवारी रोजी शैर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे हजारोंच्या संख्येने अनुयायी आले होते. त्यावेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव, संघटीत गुन्हेगारी या कलमानुसार गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात एकबोटे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी फेटाळला होता. त्यानंतर एकबोटे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. येत्या बुधवारी जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे.