वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने आरोग्यमंत्री टोपे संतापले!

rajesh tope

औरंगाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (दि. ११)  येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांच्या या भेटी दरम्यान त्यांना पाच वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळुन आले. ही परिस्थिती पाहून आरोग्य मंत्र्यांचा पारा चढला. या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा असे निर्देश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. यामुळे येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते.

शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आरोग्य मंत्री हे शिऊर येथे आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. तत्पुर्वी त्यांंनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. मात्र तब्बल पाच वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने त्यांनी  संबंधितांंची चांगलीच कानउघडनी केली. दरम्यान गैरहजर असलेल्या पाच वैद्यकिय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश टोपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना दिले. यामुळे रुग्णालयातील वातावरण चांगलेच तापले  होते. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आदींची उपस्थिती होती.

त्यांनी येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन वैद्यकिय अधिक्षक डॉ. गजानन टारपे यांच्याकडुन कामकाजाचा आढावा घेतला. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांची संख्या, झालेले लसीकरण आदींची माहिती घेतली. सद्यस्थितित रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या २४ जागा रिक्त असुन या जागा भरण्याबाबत राज्यस्तरावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती यावेळी टोपे यांनी दिली.  टोपे यांनी माजी आमदार दिवंगत आर.एम. वाणी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.

महत्त्वाच्या बातम्या