मोठी बातमी : लिलावती रुग्णालयात प्लाझमा थेरपीचा प्रयोग यशस्वी : राजेश टोपे

rajesh tope

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयातील प्लाझमा थेरपीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांना ही खुशखबर दिली.

ते म्हणाले की, लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझमा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे.

नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.

दरम्यान मालेगावमधील परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, “दाटीवाटीची जागा असल्याने अनेक ठिकाणी लोकाना घरात क्वारंटाइन होणं शक्य नाही. पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाइन केलं जाव अशी सूचना जिल्हाधिऱ्यांना दिली आहे”. बैठकीत मालेगावमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यात आली.