जयपूरमधील त्या पोस्टरमुळे बुमराह नाराज

जयपूर वाहतूक पोलिसांनी आपल्या त्या खराब चेंडूंचा वापर जाहिरातीसाठी केल्यामुळे भारताचा तरुण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चांगलाच नाराज झाला आहे. त्याने ट्विट करून ही खंतही व्यक्त केली.

वाहनचकांमध्ये रेड सिग्नल असल्यास वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच ठेवा या साध्या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांसाठी जयपूर वाहतूक पोलिसांनी एक ‘मिम’ शेअर केलाय. या ‘मिम’ची चर्चा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

रेड सिग्नल असल्यास वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच ठेवा. पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्या’ अशी कॅप्शन लिहून जयपूर वाहतूक पोलिसांनी ‘मिम’ शेअर केलाय. ज्यात एका बाजूला झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच गाड्या उभ्या आहेत तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहाचा बहुचर्चित नो बॉल दाखवण्यात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बुमराहने नो बॉल टाकला होता त्याची ती चूक भारतीय क्रिकेट संघाला चांगलीच महागात पडली.

याबद्दल बुमराहन दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये बुमराह म्हणतो, ” काळजी करू नका, मी तुमच्या कोणत्याही चुकांची खिल्ली उडवणार नाही. कारण मला माहित आहे माणसाकडून चुका होतात.”

“शाबाश! जयपुर वाहतूक पोलिस, देशासाठी आपलं सर्वोत्तम देणाऱ्यांचा आपण याप्रकारे सन्मान केला. ”

यावर जयपूर वाहतूक पोलिसांनी ट्विट करून आम्हाला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या असं म्हटलं आहे.