पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही – सुप्रिया सुळे

supriya sule

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आल्यावर पवार साहेब आणि आमच्या कुटुंबावर टीका करतात, मी याबद्दल त्यांची आभारी आहे. मोदींनी साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पंतप्रधान आज ३७० बोलतात, मात्र मागील पाच वर्षात एकदाही संसदेत काश्मीरवर चर्चा केली नाही, असा आरोपही सुळे यांनी केला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या.

काश्मीर मुद्दा हा संवेदनशील आहे, तेथील आजची स्थिती ह्रदयद्रावक असून तेथील युवकांच्या हाताला रोजगार नाही, पाच वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी संसदेत चर्चा देखील केली नाही. पुलवामाच्या हल्यानंतर देशात काश्मिरी मुलांवर हल्ले झाले. स्थानिक लोकांशी चर्चा करणे गरजेचे असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. गेल्या साठ वर्षात जेवढे हल्ले झाले नाहीत तेवढे हल्ले मागील पाच वर्षात झाल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, बारामती मतदारसंघातील एका युवकाला फेसबुक पोस्ट लिहिली म्हणून धमकीचे फोन येत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे, संबंधीत युवक पोलिस स्टेशनला गेल्यावर हा विषय महत्वाचा नसून बाकीची कामे असल्याचं सांगितले गेले, पोलिसांना मी आणि दादांनी फोन केल्यावर गुन्हा नोंद केल्याचं सुळे म्हणाल्या.

सरकार कोणाचंही असो मुलांची सुरक्षितता सरकारचे कर्तव्य आहे. पारदर्शक कारभार कृतीतून दिसणे गरजेचं आहे, पण तो केवळ भाषणात दिसतो. देशात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललेलं त्यांना सहन होत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.