15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना क्लार्कला रंगेहाथ पकडले

सातारा: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील क्लार्क प्रवीण कृष्णा मरळे (वय 37, सध्या रा. कोडोली, सातारा. मूळ रा. तुपारी, ता. पलूस, जि. सांगली) याला 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

दरम्यान, या घटनेमुळे एमआयडीसीमध्ये खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांचा जुनी एमआयडीसी सातारा या ठिकाणी प्लॉट आहे. तक्रारदाराला तो प्लॉट बँकेकडे तारण ठेवून कर्ज काढायचे होते. यासाठी क्षेत्र व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाच्या संमतीपत्राची गरज होती.

संमतीपत्राबाबत तक्रारदार हे लिपीक प्रवीण मरळे याला भेटले. संबंधित कामासाठी मरळे याने तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिली. पडताळणी करुन सापळा रचला असता 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मरळेवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.