मुख्यमंत्री नेमके काय बोलले हे त्यांनाच विचारले पाहिजे-बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना–भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकारी असा उल्लेख केला आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले. या वक्तव्यानेच भविष्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का? असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत. यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपस्थित असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपमधून महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार असलेल्या नेत्यांबद्दल मुख्यमंत्री असे म्हटले असावेत. मात्र, ते नेमके काय व कोणाबद्दल म्हणाले हे आधी त्यांनाच विचारले पाहिजे,’ असं थोरात म्हणाले आहेत.

तसेच मुख्यमंत्री काय व कोणाला उद्देशून म्हणाले, प्रथम त्यांनाच विचारले पाहिजे. मात्र, सध्या भाजपमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. भाजपमधील अनेक जण महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार आहे. ते आल्यावर तेही भावी सहकारी होऊ शकतात, असे मुख्यमंत्र्यांना सूचवायचे असेल. महाविकास आघाडीचे सरकारने आपली दोन वर्षे चांगला कारभार केला. उरलेले कार्यकाळही हे सरकार उत्तमपद्धतीने पूर्ण करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात भाजपसह अन्य पक्षांतील नेते, कार्यकर्ते प्रवेश करीत असून आणखी काही प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. त्या दृष्टीने ते आमचे भावी सहकारी ठरतात, असेही थोरात यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या