fbpx

ठरलं तर मग… चेन्नई-हैद्राबादमध्ये रंगणार आयपीएलचा फायनल

टीम महाराष्ट्र देशा- अफगाणिस्तानच्या रशिद खानने अष्टपैलू कामगिरी बजावून सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या फायनलचं दुसरं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे आयपीएलच्या विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल पाहायला मिळेल.

ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर 13 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने 20 षटकांत 9 बाद 161 धावांची मजल मारली.

सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचा नायक ठरला तो रशिद खान. संघाला गरज असताना त्याने 10 चेंडूंत चार षटकारांसह नाबाद 34 धावांची तुफानी खेळी साकारली. त्यानंतर कोलकात्याच्या तीन फलंदाजांना आपल्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर तंबूत धाडत रशिदने हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

हैदराबादकडून राशिद खानने ४ षटकात १९ धावा देत ३ गडी घेतले. त्याला कार्लोस ब्रेथवेट आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी २-२ तर शाकिब अल हसनने १ बळी घेत चांगली साथ दिली. कोलकात्याकडून सलामीवीर ख्रिस लीनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही.