मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. काल रात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सरकारी वर्षा बंगला सोडला आणि त्यांचे वडिलोपार्जित घर मातोश्रीवर स्थलांतरित झाले. राज्यातील महाविकास आघाडी आघाडी आमदारांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, “महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही, असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे. प्रसिद्धी माध्यमांमधून ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण विधानसभेचे जे सभासद महाराष्ट्राबाहेर गेले, ते पुन्हा राज्यात आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना नेले ही वस्तुस्थिती लोकांना सांगतील व ते पुन्हा शिवसेनेसोबत राहतील. त्यानंतर बहुमत कुणाचे आहे, ते सिद्ध होईल.”
सरकार आपले बहुमत सिद्ध करेल-
“सरकार अल्पमतात आहे की नाही, हे विधानसभेत सिद्ध होत असते. जेव्हा विधानसभेत फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा हे सरकार बहुमतात असेल, असा मला विश्वास वाटतो. तसेच अशा प्रकारची स्थिती मी महाराष्ट्रात अनेकदा पाहिली आहे. मला पूर्ण खात्री आहे की यावेळी देखील सरकार आपले बहुमत सिद्ध करेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार चालेल हे संपूर्ण देशाला दिसेल,” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
“एकनाथ शिंदे यांनी वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्याकडे देशातील सर्व पक्षांची यादी आहे. या यादीत निवडणूक आयोगानुसार देशात सहा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे हे सहा पक्ष आहेत. काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी शिंदे यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे उरलेला राष्ट्रीय पक्ष कोणता ते सर्वांना माहीत आहे,” असे देखील शरद पवार म्हणाले.
“सूरत आणि आसाममध्ये बंडखोर आमदारांची व्यवस्था करणारे जे लोक दिसले ते माझ्या परिचयाचे आहेत. सूरतमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे मराठी गृहस्थ आहेत. ते संसदेचे सदस्य असल्यामुळे मी त्यांना ओळखतो. त्यांचा सूरतमधील व्यवस्था करण्यात सहभाग असेल तर याचा अर्थ काय समजायचा?, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
शरद पवार म्हणाले, “आसाममध्ये सबंध व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने केली. आसाम राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मदत करणारे राज्यात कुणी दिसत नसले तरी आसाममध्ये कोण काय करतंय हे सर्वांना दिसत आहे. शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावे लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय हा अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.”
महत्वाच्या बातम्या :