हजारे म्हणाले, तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करा; मात्र नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी!

hajare

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- गावचा विकास थांबविण्यासाठी अंतर्गत वाद कारणीभूत असतात. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावागावात गटबाजी भांडणे वाद होतात व त्यातून भाऊबंदकी सुरू होते. त्यामुळे गावाचा विकास थांबतो, त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर गावाच्या विकासास चालना मिळेल, यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी आमदार निलेश लंके यांना दिला होता.

लंके यांनीही तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जास्तीत जास्त बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले, मात्र लगेचच होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे अण्णांचा सल्ला हा केवळ नावापुरताच म्हणावा लागेल. सध्या पारनेर तालुक्यात नगर पंचायतीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

हजारे यांचा तालुका असलेल्या पारनेरमध्ये निवडणुका जास्तीत जास्त बिनविरोध होतील, अशी अपेक्षा आहे. परंतु आता पारनेर नगरपंचायतीचे बिगुल वाजले आहे. विशेष म्हणजे या नगरपंचायतीत परस्पर विरोधी ठाकलेले राष्ट्रवादीचे आमदार लंके व शिवसेनेचे माजी आमदार औटी हे कट्टर विरोधक होऊन बसले आहेत.

प्रत्यक्षात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष मित्र पक्ष आहेत. असे असताना पारनेर नगरपंचायतीत या दोन नेत्यांत सामना रंगणार आहे. पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिसरी आघाडीही जोर धरू लागली आहे. तिला काही अंशी भाजपचे सहकार्य असल्याचे मानले जाते. भाजपकडून या निवडणुकीसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले या दिग्गजाचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे बिनविरोधचा नारा फोल ठरणार आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बरोबरच नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे सर्वसामान्यांचे मत आहे. किमान हजारे यांचे तरी नेत्यांनी ऐकावे, असा सूर कार्यकर्त्यांतून व्यक्त होताना दिसत आहे. विशेष म्हणजे निवडणुका बिनविरोध करण्याचा सल्ला संपूर्ण देशाला देणाऱ्या हजारे यांच्या तालुक्यातचं निवडणुका होत असल्याने अण्णा हजारे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या