१९ महिने काय तुम्ही झोपा काढत होता का? मुश्रीफांच्या ‘त्या’ आरोपावरून चंद्रकांतदादांचा पलटवार

hasan mushrif vs chandrakant patil

पुणे : महाराष्ट्राचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकले असल्याचे पाहायला मिळत आहे. आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केला आहे. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

या आरोपांवर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचंही जाहीर केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

‘महाराष्ट्रात आम्ही हॅम नावाचा ऐतिहासिक प्रकल्प केला, ज्या रस्त्यांचं काम पूर्ण झाल्याचे कार्यक्रम हे करत फिरत आहेत. त्या हॅममध्ये घोटाळा आहे असं जर मुश्रीफांचं म्हणणं आहे, तर १९ महिने काय तुम्ही झोपा काढत होतात का? आत्ता तुम्हाला जाग आली का? त्यांना हॅमविषयी तक्रार करायची असेल, तर काही अडचण नाही,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आव्हान दिलं आहे.

पुढे ते म्हणाले, ‘१९ महिन्यांत करण्यासारखं खूप होतं. मात्र यांनी कोविडमध्ये पैसे खाण्याशिवाय दुसरं काम केलं नाही. त्या काळात हे करता आलं असतं. मी धमक्यांना घाबरत नाही. तुमची काही चूकच नसेल, तर घाबरण्याचं काय कारण?’ असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :