यशासाठी सकारात्मक ऊर्जा बाळगा – कृष्णप्रकाश 

पुणे : ‘कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती, प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा व दृष्टिकोन याची आवश्यकता असते. स्पर्धा परीक्षा व इतर आव्हानात्मक परीक्षांमध्ये सातत्य आणि सराव या गोष्टींना महत्व आहे. त्यामुळे युवकांनी आपल्यातील सकारात्मक ऊर्जा ओळखून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत’ असा सल्ला विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Loading...

सृजन संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या व इतर विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी : स्पर्धा आणि संधी’ यावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व लेखक संजय आवटे, उद्योजक रणजितसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य व सृजनचे संस्थापक रोहित पवार आदी उपस्थित होते.

कृष्णप्रकाश म्हणाले, भ्रष्टाचाराचे मूळ मानसिकतेत आहे. त्यासाठी संस्थात्मक आणि वैचारिक परिवर्तन होणे आवश्यक असून, आपण सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर योग्य निर्णय घेण्याचे दायित्व असते. त्यामुळे ‘सोच’ बदलून प्रामाणिकपणे काम करण्याचा, कायद्याचे रक्षण करण्याचा आणि सर्वाना सामान वागणूक देण्याचा मानस अधिकारी झाल्यानंतर असला पाहिजे.

महाविद्यालयीन जीवनात पोलिसांकडून त्रास सहन करावा लागला. त्या ईर्ष्येतून पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पहिले आणि पूर्ण केले. आज अधिकारी म्हणून वावरतानाच ‘आयर्न मॅन’, ‘अल्ट्रा मॅन’ ही आव्हानात्मक कामगिरी करू शकतो कारण इच्छाशक्ती आणि सरावातील सातत्य हे आहे. सगळ्या ‘वादा’वर वाद घालणाऱ्यांना दिशा देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता पोलादी विचारातून जे क्षेत्र निवडाल त्यात यशस्वी होईल, असा आत्मविशास बाळगा, असेही कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

संजय आवटे म्हणाले, स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वकाही हा समज बदलला पाहिजे. त्याव्यतिरिक्त अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या वाटा आपण निवडल्या पाहिजेत. वाचन, शिक्षण यापेक्षाही जगण्यातून अधिक शहाणपण येते. त्यामुळे अंतर्मनातील संवादातून आपल्याला वाटते, त्या क्षेत्रात चांगले करिअर उभारावे. आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या मार्ग निश्चित करावा. आजचा युवा हा आधुनिक आणि तांत्रिक युगात वावरणारा आहे. नव्या माध्यमांमुळे उपलब्ध संधींचा फायदा करून घेण्याचे कौशल्य आपण आत्मसात करावे.

रणजितसिंह पाटील म्हणाले, वर्दीचे आकर्षण लहानपणापासून होते. मात्र, काही कारणांनी पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊनही ते स्वप्न पूर्ण झाले नाही. त्या अपयशातून प्रेरणा घेत सुरक्षा क्षेत्रात उतरलो. दोन माणसांवर सुरु केलेला व्यवसाय आज सात हजार लोकांवर उभारला आहे. कामातील प्रामाणिकपणा, सचोटी यामुळे व्यवसाय वाढत गेला. दहावीत नापास झालेला असतानाही आज २२ देशात व्यवसाय उभारला आहे. त्यामुळे नव्या संधी खूप आहेत. आपण त्या जाणून घेतल्या पाहिजेत.

स्त्रीआरोग्य, शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रात सृजन संस्थेतर्फे उपक्रम राबविले जातात. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतर इतर क्षेत्रातही असलेल्या अनेक संधी युवकांपुढे आणण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आज युवकांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न होतो. तो आपण हाणून पाडला पाहिजे, असे रोहितदादा पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. स्वप्नील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. आकाश झांबरे यांनी आभार मानले.

सुपरस्टार रजनीकांतचा एकत्र निवडणुक घेण्यास पाठींबाLoading…


Loading…

Loading...