कोल्हापूरकरांच्या रोषाला घाबरूनचं चंद्रकांत पाटील पुण्याला पळाले : हसन मुश्रीफ

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात गुरुवारी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान मोदींनी ही लाल किल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. तसेच राज्यात देखील स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला. विशेष म्हणजे कोल्हापूर सांगली या आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मात्र या स्वातंत्र्य दिनी कोल्हापूरच्या पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितीत राहणे अपेक्षित होते. मात्र ते अनुपस्थितीत राहिले. यावरून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात थांबून राहणे आवश्यक होते. परंतु ते कोल्हापूर सोडून बाहेर गेले आहेत. दरम्यान पूरग्रस्तांच्या रोषाला घाबरूनच चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यात ध्वजारोहण केले, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यावेळी मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांतदादांनी पूरग्रस्तांच्या साथीने झेंडावंदन केले असते तर समाजात चांगला संदेश गेला असता. उलट, देशाचे ऐंशी वर्षाचे नेते शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊन पूरग्रस्तांची संवाद साधत आहेत. तसेच कोल्हापूरातच पूरग्रस्तांच्या सोबत झेंडावंदनही करतात . ही बाब निश्चितच भूषणावह आहे. त्यामुळे पवार यांचा आदर्श चंद्रकांत पाटील यांनी घेण्याची गरज आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.