राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिली आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ही राजीनाम्याची जाहिरात आहे. शिवराज्य बहुजन पक्ष या आपल्या पक्षाच्या बॅनरखाली ही जाहिरात देण्यात आली आहे.

जुलै महिन्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. राज्यात माणसे मरू लागली आहेत. अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता.

या जाहिरातीत नेमकं काय म्हटलं आहे जाधव यांनी ?
‘मराठा आरक्षणाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका. मराठा समाजाला न्याय देण्याचं कर्तव्य तुमच्या हातात होती, त्यात तुम्ही दिरंगाई केली. त्यामुळे बरीच कोवळी मुलं आत्महत्येकडे वळली. या कारणांमुळे मी माझा राजीनामा कायम ठेवत आहे. धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा शब्दही तुम्ही पाळला नाहीत. त्यामुळे तुमच्या विधानसभेच्या जंत्रीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा अशी जाहीर विनंती करतो.’

मराठा आरक्षण : अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा

पुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात