fbpx

इंदापूर तालुक्याच्या वतीने हर्षवर्धन पाटलांनी घेतले पूरग्रस्त गाव दत्तक

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याच्या वतीने शिरोळ तालुक्यातील अकिवाट हे गाव दत्तक घेतले आहे. या गावासाठी तालुक्याच्या वतीने रूपये २५  लाखांचा निधी देण्यात येणार आहे. वर्षभर वेगवेगळ्या योजनांमधून मदतही दिली जाणार आहे. दरम्यान अकिवाट गावात रविवारी इंदापूर तालुक्यातील सुमारे २००  कार्यकर्ते जाऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे.

हर्षवर्धन पाटील हे सन २०१०  पर्यंत सलग दहा वर्षे कोल्हापूरचे पालकमंत्री होते. त्याकाळात जिल्ह्यात केलेल्या चांगल्या कामाबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे नाव आदराने घेतले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका खूपच पाण्याखाली होता, त्यामध्ये प्रामुख्याने नरसिंहवाडी, कुरुंदवाड, अकिवाट आदी गावे पूर्णपणे पाण्याखाली होती.

हर्षवर्धन पाटील यांनी अकिवाट हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अकिवाट गावामध्ये रविवारी हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत आगामी विकास कामांबाबत नियोजन केले जाणार आहे. इंदापूर तालुक्यामधून आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी या गावात दिवसभर स्वच्छता मोहीम राबवली आहे.