नंदुरबारला शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नीच्या हस्ते १०५ फुटी ध्वजारोहण

नंदुरबार:  नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिराच्या प्रांगणात १०५ फूट उंचीवर ध्वजारोहण करण्यात आले. शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलिस पथक बँडने राष्ट्रगीत सादर केले. मात्र एरवी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशीच ध्वजारोहण होत असते. परंतु आमदार चंद्रकांत रघूवंशी मित्रमंडळाने नाटयगृहाच्या प्रांगणात १२५ फूटी ध्वज उभारला आहे.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी राज्यमंत्री अमित देशमुख,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, आमदार के सी पाडवी, आमदार चंद्रकांत रघूवंशी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, नगराध्यक्षा रत्ना रघूवंशी आणि शहीद मिलिंद खैरनार यांचा परिवार कार्यक्रमाला उपस्थित होता.

रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ध्वज वर चढविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. तर शहीदांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शहीद शिरीषकुमार,शहीद मिलिंद खैरनार अमर है च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्यासह नगरपालिकेचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. ध्वज १२५ फूटावर जाण्यास पाच मिनिटे लागले. त्यानंतर नागरीकांनी ध्वजाला सलामी दिली. कार्यक्रमापूर्वी देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.