नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाने महिला आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध विजयाची नोंद करून इतिहास रचला आहे. शुक्रवारी भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या आणि त्यानंतर टीम इंडिया अवघ्या 124 धावांत ऑलआऊट झाली. 13 धावांनी हा सामना जिंकत पाकिस्तान महिला संघाचा भारताविरुद्ध सर्व फॉरमॅटमधील पहिला विजय ठरला आहे. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने संघाच्या पराभवाचे मोठे कारण सांगितले. याशिवाय हरमनने काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याबाबतही सांगितले.
हरमनप्रीत कौर म्हणाली की, मला वाटते मधल्या फळीमध्ये आम्ही इतर फलंदाजांना संधी देण्याचा प्रयत्न करत होतो. जी किंमत आज मोजावी लागली. पाकिस्तानने जास्त अवघड टार्गेट दिल नव्हतं. मधल्या षटकांमध्ये आम्हाला स्ट्राईक रोटेट करता आला नाही. संघात जो कोणी नवीन असेल त्याला विश्वचषकापूर्वी पुरेसे सामने मिळावेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. इतरांसाठी ही एक चांगली संधी होती. आम्ही कोणत्याही संघाला हलक्यात घेत नाही. हा खेळाचा भाग आहे. आम्हाला काही गोष्टींवर काम करून संघ आणखीन मजबूत करण्याची गरज आहे.
दरम्यान, प्रत्येकजण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत होता, परंतु असा निकाल लागेल अशी अपेक्षा नव्हती. दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर होईल, अशी अपेक्षा आहे. पण पाकिस्तानने हा सामना एकतर्फी जिंकला. महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावरील हा पहिला विजय आहे. गेल्या 11 सामन्यांपैकी प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय मिळवला होता, मात्र यावेळी त्यांचा विजय रथ थांबला.
भारतावर पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय
पाकिस्तान संघाने आशिया कपच्या T20 फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध एकूण 6 सामने खेळले आणि आता त्यांच्या खात्यात एक विजय जमा झाला आहे. यापूर्वी झालेल्या पाचही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. दुसरीकडे, वनडे फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत येथे टीम इंडियाचा दबदबा कायम आहे. महिला आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये एकूण 6 एकदिवसीय सामने खेळले गेले आणि सर्व सामने भारतीय संघाने जिंकले.