बौध्दिक क्षमता वाढीसाठी ग्रंथालयांची आवश्यकता – हरिभाऊ बागडे

haribhau bagde

धुळे  : ग्रंथसंपदा बौध्दिक क्षमता वाढवितात. त्यामुळे ग्रंथालय आवश्यक बाब आहे. ग्रंथ हे जीवनाचा स्थायी भाव आहेत, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले.

आमदार अनिल गोटे यांच्या प्रयत्नातून ग्रंथालयास मिळालेल्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या नूतन इमारतीचा भुमिपूजन सोहळा पांझरा नदी काठावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला.

त्यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, जिल्हा विकास योजनेच्या माध्यमातून साकारणारे ग्रंथालय सुसज्ज राहील. या ग्रंथालयाचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. या ग्रंथालयास नानासाहेब उत्तमराव पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे, असे सांगत त्यांनी नानासाहेबांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.