वाढत्या आत्महत्यांमुळे राज्य सरकार हैराण; सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्याचे आदेश

राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय

मुंबई: मंत्रालयातील वाढत्या आत्महत्यांमुळे चिंतेत असलेल्या राज्य सरकारने सामान्यांना भेटा, त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून त्यांना सहकार्य करा, असे निर्देश अधिकारी वर्गाला दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मंत्रालयीन अधिकाऱ्यांना रोज दुपारी २.३० ते ३.३० ही वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी. असा आदेश तसेच उपविभागीय आणि त्यावरील अधिकाऱ्यांनी सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस दुपारी तीन ते पाच या वेळेत नागरिकांना भेटावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने मंत्रालय इमारतीच्या भिंतीला जाळ्या लावल्या होत्या मात्र त्यापेक्षा सरकारने सर्वसामान्यांच्या तक्रार निवारणाच्या सूचना अधिकाऱ्यांना देऊन सकारत्मक निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १८ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.