माधुरीला आपण ज्या नजरेने पाहतो, तीच नजर सनी लिओनीला पाहताना का नसते? – हार्दिक पटेल

इंदूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील श्रीदेवी, माधुरी, नर्गिस या दिग्गज अभिनेत्रींकडे प्रेक्षक ज्या नजरेने पाहतात, त्याच नजरेने पोर्नस्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीकडे का पाहिले जात नाही, असा प्रश्न पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला. ते इंदूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हार्दिक यांनी म्हटले की, सनी लिओनीकडे केवळ एक अभिनेत्री म्हणून का पाहिले जात नाही? प्रत्येकवेळी तिची पॉर्नस्टारची ओळख आडवी का येते?

आपण नर्गिस, माधुरी आणि श्रीदेवी या अभिनेत्रींकडे ज्या नजरेने पाहतो तसेच सनी लिओनीकडे का पाहू नये?, असे अनेक सवाल हार्दिक यांनी उपस्थित केले. आपण हाच दृष्टीकोन ठेवून चाललो तर तोपर्यंत देशात काहीच बदलणार नाही, असेही हार्दिक पटेल यांनी यावेळी म्हंटले.

यावेळी हार्दिक पटेल यांनी भाजपावरही टीका केलीये. भाजप म्हणजे ‘सत्ता लालची पार्टी’ आहे असं ते म्हणाले. जर २०१९ मध्ये निवडणुकांत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. ज्या पद्धतीने कर्नाटक निवडणुकांनंतर राज्यपालांनी बहुमत असतानाही काँग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेची संधी न देता भाजपाला बोलावलं, त्यावरुन देशात घटना संपवण्याची भाजपची तयारी सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी यावेळी केला.