हनुमानजी जगातील पहिले आदिवासी नेते; भाजपा आमदाराची मुक्ताफळे

जयपूर: हनुमान जगातील पहिले आदिवासी नेते होते अशी मुक्ताफळ एका भाजपा आमदारानं उधळलीयेत. ज्ञानदेव अहुजा असं त्यांचं नाव आहे. अहुजा हे रामगढमधून भाजपचे आमदार आहेत. हनुमानाचा अपमान करणाऱ्या घटनेचा संदर्भ देऊन अहुजा बोलत होते. ‘हनुमान यांनी पहिले आदिवासी नेते म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला. त्यामुळेच जगभरात मोठ्या प्रमाणात हनुमानाची मंदिरं पाहायला मिळतात. त्यामुळे आपण हनुमानाचा अपमान करु नये,’ असं अहुजा यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘हनुमानजी जगातील पहिले आदिवासी नेते होते. आदिवासी समाजातील पहिले संत म्हणूनदेखील हनुमान यांचं नाव घेता येईल. भगवान राम चित्रकूटाच्या दिशेनं जात असताना हनुमानजींनी आदिवासींचं सैन्य तयार केलं. या सैन्याला भगवान रामानं प्रशिक्षण दिलं होतं’ असा दावा देखील त्यांनी केला आहे.

यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा गैरकृत्यांमध्ये सहभाग असतो. जेएनयू म्हणजे सेक्स आणि ड्रग्जचा अड्डा आहे. तिथे दररोज 3 हजार कोटी कंडोम आणि 2 हजार दारुच्या बाटल्या सापडतात. असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.