ठाणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशारा दिला होता. तद्पश्चात काल (३ एप्रिल) ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील पक्ष कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली.
कल्याणमधील साई चौकातील पक्ष कार्यालयाबाहेर मनसेचे स्थानिक कार्यकर्ते जमले आणि त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून मोठ्याने घोषणा दिल्या. तसेच त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या. मनसे कल्याण विभागाचे अध्यक्ष उल्हास भोईर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन करण्यास कार्यकर्ते कधीही मागेपुढे पाहणार नाहीत. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मनसे कार्यकर्ता महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले, त्यानंतर ३ एप्रिललाच त्यांची सुटका करण्यात आली.
महेंद्र भानुशाली यांनी आपल्यावरील पोलिस कारवाईचा निषेध केला आणि ‘हनुमानजीची आरती’ केल्याबद्दल आम्हाला त्रास दिला जात असल्याचे सांगितले. भानुशाली म्हणाले की, हिंदूंच्या प्रार्थनांशी वैर असावे का? कोणाला याचा त्रास असेल तर त्यांनी कान बंद करून घरात बसावे. त्यांनी अशा गोष्टींना विरोध केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.
दरम्यान, यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना घाटकोपर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महेंद्र भानुशालीने चांदिवलीच्या असल्फा येथील हिमालय सोसायटीत झाडावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवताना त्याला ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी भानुशालीला ताब्यात घेतले आणि लाऊडस्पीकर जप्त केला. सुमारे २ तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. भानुशाली यांना ५५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम १४९ अंतर्गत अशा कृत्याची पुनरावृत्ती करू नये म्हणून नोटीस बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “टीका आणि नकला करण्याशिवाय त्यांना…”, राजे ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- “…पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे भाजपला साधी हळहळ वाटू नये याचे आश्चर्य”, संजय राऊतांचा घणाघात
- “त्यांनी हनुमान चालिसा जरुर लावावी पण…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- “…तर नरेंद्र मोदींशीवाय पर्याय नाही”; संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल
- IPL 2022: पंजाबचा विस्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ आहे हिटमॅनचा फॅन; म्हणाला “मला त्याच्यासारखं खेळायचंय…”