निष्काळजीपणा; नियमांचे उल्लंघन करून कोरोना लसींची हाताळणी

औरंगाबाद : राज्य सरकारकडून औरंगाबाद शहरासाठी २० हजार कोरोना लसींचा पुरवठा बुधवारी प्राप्त झाला. शनिवारपासून शहरातील पाच केंद्रांवर प्राथमिक टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. दरम्यान कोरोना लसीचे बॉक्स व्हॅनमध्ये टाकताना पालिकेचे कर्मचारी विनामास्क आढळून आल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला.

राज्य सरकारकडून मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला. शहरातील सिडको एन-५ येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात कोरोना लस घेऊन व्हॅन दाखल झाली. तेथून पालिकेच्या मोबाइल व्हॅनमध्ये या लसींचे बॉक्स टाकण्यात आले. मात्र यावेळी पालिकेचे कर्मचारी विनामास्क आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या एकूण लसींच्या पुरवठ्यातून शहरासाठी २० हजार कोरोना लस मिळाल्यात. यांचा साठा बन्सीलालनागर येथील पालिकेच्या व्हॅक्सीन कोल्डस्टोरेज येथे करण्यात आला आहे. १६ जानेवारीपासून प्राथमिक टप्प्यात शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची सुरुवात करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मनपाकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल करून मनपाने आपली तिजोरी भरली आहे. मात्र कोरोना लसींची हाताळणी करताना मनपाचेच कर्मचारी नियमांचे उल्लंघन करत आहे. यावर मनपा काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या