बीडच्या पालकमंत्र्यांना भाजपला मतदान होत नाही त्या बूथची यादी कशाला हवी – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने मुंडे हे सर्वात मोठे नाव आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी कमान सांभाळली. या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये उमेदवार वेगळे असले, तरी खरी लढत पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या चुलत भावंडातच होती.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडी कडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. मात्र निवडणूक झाल्यानंतर सुद्धा या भावंडात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

आता “तुम्हा माध्यमांसमोर येण्याआधी बीडमधून मला अशी माहिती मिळाली की, तिथले पालकमंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारत आहेत की, जिथे भारतीय जनता पार्टीला परंपरागत मतदान मिळत नाही, त्या बूथची यादी द्या. ती यादी कशासाठी? ज्या गावामध्ये भाजपला मतदान मिळत नाहीत, त्या बूथ क्रमांकाची यादी तुम्हाला कशाला पाहिजे? आज तीन दिवसांवर मतमोजणी आलीय. हे एकट्या बीडमध्येच नाही. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने चालू आहे. ईव्हीएम हॅकिंगचा पुन्हा काही प्रयत्न चालू आहे का? ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात काही विषय चालू आहे का?” असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यावर पंकजा मुंडे काय उत्तर देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.