अधिवेशन सुरु होण्याआधीच ठाकरे सरकारमधील अर्धा डझन मंत्री झाले कोरोनाग्रस्त

uddhav thackeray

मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्या आधीच अनेक राजकीय नेते विशेषतः महाविकास आघाडीतील मंत्री अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत.

नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करून आपली कोराना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. तसचे संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान,कोरोना काळात राज्याच्या आरोग्य विभागाचा भर डोक्यावर घेत धावपळ करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.३-४ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील नुकतीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याशिवाय दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान,राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. एकदा कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोना सदृश्य लक्षणे आणि लागण झाल्याची माहिती समोर आली होती.आता ते तिसऱ्यांदा कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत.

महत्वाच्या बातम्या