युपीत विजेचे खांब,बस गाड्यानंतर हज हाऊसही भगवं केलं!

yogi adityanath feacture

टीम महाराष्ट्र देशा- सत्तेत आल्यापासून राज्य सरकारच्या बस गाड्या, विजेचे खांब, सरकारी संकेतस्थळं व माहिती पुस्तिका भगव्या केल्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारनं आता चक्क हज हाऊसही भगव्या रंगात रंगवून टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . मुस्लिम समाजातील काही संघटना व राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारच्या या कृतीला तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘भगवा रंग हा तेजस्वी, उत्साह निर्माण करणारा आहे. या रंगामुळं इमारतही खुलून दिसते. त्यामुळं हज हाऊसला हा रंग देण्यात काहीही चूक नाही. विरोधकांकडं सरकारविरोधात बोलण्यासारखं काहीही नसल्यानं ते विनाकारण वाद निर्माण करत आहेत अस मत यूपी सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री मोहसीन रझा यांनी व्यक्त केलं आहे.

haj-house

हज यात्रेकरूंची मक्केला जाण्याची सर्व व्यवस्था हज हाऊसच्या इमारतीतून केली जाते. मक्केला जाण्यासाठी याच ठिकाणांहून परवानगी मिळते. तिथंच सरकारी अधिकारी विविध कागदपत्र तपासतात. उत्तर प्रदेशातील हज हाऊसची इमारत लखनऊ इथं आहे. या इमारतीच्या बाहेरील भिंती सरकारनं भगव्या करून टाकल्या आहेत. भगव्या रंगाची ओळख हिंदुत्वाचा रंग अशी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील सर्व संघटना याच रंगाच्या माध्यमातून स्वत:ची ओळख सांगतात. भाजपही याच परिवाराचा भाग असल्यानं विरोधकांनी सरकारच्या या कृतीबद्दल नाराजी दर्शवली आहे.