भोंदू हैदरअलीच्या कार्यालय आणि घरावर सीसीटीव्हीचा खडा पहारा

पुण्यातील एक महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा हैदरअली शेख आरोप

सातारा: आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने पुण्यातील एक महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला हैदरअली शेख (वय ४६, रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्या साता-यातील फ्लॅटमध्ये पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली. या भोंदूबाबाच्या कार्यालय आणि घरावर सीसीटीव्हीचा खडा पहारा पाहून पोलिसही आवाक झाले.सातारा स्थित असलेल्या या भोंदूबाबाने पुण्यामध्ये भानगडी केल्यानंतर त्याचे एक-एक किस्से आता समोर येऊ लागले आहेत.

अमावस्या, पोर्णिमेला म्हणे या भोंदूबाबाचा दरबार भरत होता. लाल बहादूर शास्त्री कॉलेजच्या पाठीमागील एका इमारतीमध्ये या बाबाचे दोन फ्लॅट आहेत. दुस-या मजल्यावरील फ्लॅटमध्ये तो दरबार भरवित असत. तर तळ मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये तो कुटुंबासह राहत आहे. संपूर्ण इमारतीमध्ये कोणाच्याही फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही नाहीत.मात्र, या भोंदूबाबाच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर दोन सीसीटीव्ही लावलेले आहेत. येणा-या जाणा-या प्रत्येकावर भोंदूबाबाचा वॉच असायचा. भूत उतरवून देतो, आजार बरा करतो, असे सांगून तो दरबार भरवत होता. साता-यामधील लोकही आता त्याचे किस्से सांगू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी या भोंदूबाबावर वाई पोलिस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल झाला असल्याचे समोर येत आहे. तसेच २००६ ला सातारा पालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्येही तो निवडणुकीला उभा राहिला होता. त्यावेळी त्याचे डिपॉझिटही जप्त झाले होते. काही वर्षांपूर्वी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी असं वागू नको, अशी समजूतही घातली होती. मात्र, त्याच्या उचापतीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचे अनेकजण सांगतायत.

You might also like
Comments
Loading...