कर्नाटक : राजकीय भूकंपाचा आणखी एक धक्का, एच. नागेश यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यापैकी ११ आमदारांची मुंबईतील एका आलिशान हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकाबाजूला काँग्रेसच्या आणि जनता दल सेक्युलरच्या नेत्यांचे धाबे दणाणले असताना आता बंडखोरांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. कर्नाटकात ४-५ बंडखोऱ आमदार आहेत यापैकी काही बंडखोर आमदार भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अपक्ष आमदार एच. नागेश यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र पाठवून दिले आहे. भाजपने सरकार स्थापन केल्यास त्यांना आपला पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आमदार नागेश आज विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले आहेत.